नवी दिल्ली : मुस्लिम महिलांचा लिलाव करणाऱ्या ‘बुली बाई अॅप’ने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून २१ वर्षाच्या तरुणाला अटक केल्यानंतर आणखी एका तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणात ही १८ वर्षांची मुलगीच प्रमुख आरोपी असल्याने पोलीस देखील चक्रावले आहेत.
सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून विशाल कुमार झा या तरुणाला अटक केली. यानंतर पोलिसांनी उत्तराखंड येथून १८ वर्षांच्या तरुणीला ताब्यात घेतले असून, ती प्रमुख आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणीला उत्तराखंडमधील रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर करण्यात आलेली ही दुसरी अटक आहे. याआधी सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून विशाल कुमार झा या तरुणाला अटक केली.विशाल हा मूळचा बिहारचा रहिवासी असून, तो स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणीशी विशालची समाजमाध्यमांवरून ओळख झाली होती.
दोघेही या प्रकरणाच्या कटातही सहभागी आहेत. दरम्यान विशालच्या वकिलांनी त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे.या तरुणीला उधम सिंग नगर जिल्ह्यातील न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असता तिचे मुंबईला प्रत्यार्पण करण्याची परवानगी देण्यात आली. पोलीस आणि तरुणी अद्यापही उत्तराखंडमध्ये असून मुंबईतून महिला पोलीस अधिकारी येण्याची वाट पाहत असल्याचे जिल्हा पोलिसांनी सांगितले आहे.