लॉकडाऊन नकोच; निर्बंध पाळू……ललित गांधी

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची व्यापारी, उद्योजकांकडून कडक अंमलबजावणी केली जाईल पण कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ नये लॉकडाऊनचा निर्णय हा व्यापारी व उद्योगांसाठी मारक ठरेल, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांंधी यांनी राज्य सरकारकडे मांडली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या संसर्गाची फारशी माहिती नसल्याने योग्य त्या उपाययोजना करण्यास राज्य सरकारला विलंब झाला. त्यातच केंद्र सरकारनेही लॉकडाऊन जाहीर केले. कालांतराने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने राज्य सरकारने पहिल्या व दुसर्‍या लाटेतही लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनचा व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला. आता तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंधाचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन जाहीर करू, असा इशारा दिला आहे.या अनुषंगाने ललित गांधी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पुणे येथे भेट घेतली. गांधी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत त्याला व्यापारी व उद्योजकांचा पाठिंबा आहे. शासन जे निर्बंध घालेल, त्याचे काटेकोर पालन केले जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्याला व्यापारी वर्गाचा पूर्णत: विरोध राहणार आहे.