आत्ताचं काही बोलणार नाही, पण लवकरच ‘त्या’ प्रकरणाचा पर्दाफाश करू : ना.सतेज पाटील

कोल्हपूर प्रतिनिधी : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन बुली बाई नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत धागे दोरे हाती लागले असून, लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश करू अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. याबाबत सायबर सेलला आपण चौकशीचे आदेश दिल्याचेही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

एका अज्ञात गटाकडून गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांचे  फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केले जात आहे. याची दखल आता राज्याच्या गृह खात्याने घेतली असून याबाबत आपण सायबर सेलला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

काल शनिवारी, १ जानेवारी २०२२  रोजी बुली बाई नावाने अॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाबाबत धागे दोरे हाती लागले आहेत. मात्र, तपास सुरु असल्याने आपण आताच काही बोलणार नाही. परंतु लवकरच याचा पर्दा फाश करू असेही गृहराज्यमंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.