मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आ.अमल महाडिक यांनी मुंबई येथे भेट घेऊन महसूल विभागाशी निगडित विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासंदर्भात प्रामुख्याने चार महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.

शेंडा पार्क येथे डेंटल कॉलेज उभारण्यासाठी 6 एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यासोबतच मतदारसंघातील गावांमधील ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
समाज कल्याण विभागामार्फत मंजूर झालेल्या 4 वस्तीगृहांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. तसेच शेंडा पार्क येथेच सहकार भवन उभारण्यासाठी 1.5 एकर जमीन मिळावी, अशी मागणीही महसूल मंत्र्यांकडे करण्यात आली.
या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.
या भेटीमुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय सुविधांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
