मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक – मुख्यमंत्री

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असे सांगून कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपमहापौर अक्षय जरग आदी उपस्थित होते.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले. पूर्वी ‘पॅलेस थिएटर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला १९५७ पासून ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या आणि कोल्हापूरकरांचे प्रचंड प्रेम असलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये तात्काळ दिले. या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण आधीचेच बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामधील बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जुगलबंदी ही मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे. संगीतसूर्य भोसले यांच्या नावाच्या नाट्यगृहाने संगीत, शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या बाबी पाहिल्या आहेत. या नाट्यगृहाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक त्या बाबी करण्यात येतील. नाट्य चळवळ, रंगभूमी असो किंवा चित्रपट या सर्व बाबींमध्ये कोल्हापूरचे मोठे योगदान नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पंडित विष्णू पलुसकर, दिगंबर पलुसकर, सुधीर उर्फ बाबुजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे कोल्हापुरातले. पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले. भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी कोल्हापूर शहर राहिली आहे, असे सांगून संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने असलेल्या या नाट्यगृहाचे पुन्हा एकदा नवनिर्मित रूपात उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

🤙 8080365706