कोल्हापुरात उत्साहात साजरा झाला फ्रेंडशिप डे. रंकाळ्यावर सेल्फी, कॉफी ट्रिटसह मैत्रीचे बंध दृढ

कोल्हापूर : “मित्र म्हणजे जगण्यातला गारवा, अंधारातला दिवा आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर निःस्वार्थपणे सोबत उभा राहणारा आधार” या भावने कोल्हापुरातील तरुणाईने फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला.

 

रविवारी रंकाळा परिसर, उद्यान, मॉल, कॅफे, रेस्टॉरंट्स आणि पर्यटनस्थळांवर मित्र-मैत्रिणींची मोठी गर्दी दिसून आली. फ्रेंडशिप बँड बांधणे, एकमेकांना शुभेच्छा देणे, कॉफी आणि जेवणाची ट्रिट देणे, सेल्फी काढणे आणि रील्स तयार करणे असा तरुणाईचा दिवस गेला.

 

शाळा, महाविद्यालये आणि नोकरीनिमित्त दूर गेलेल्या अनेक मित्रांनीही या दिवशी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक मध्यमवयीन मित्रांनीही कुटुंबासह भेटीगाठी घेतल्या.

 

महाविद्यालयातील अनोखी मैत्री

महावीर कॉलेजमधील तरुणांनी अनोख्या पद्धतीने मैत्री दिन साजरा केला. अनाथ बालकांना गरजू वस्तूंचे वाटप करून त्यांनी मैत्रीला माणुसकीचा स्पर्श दिला. फ्रेंडशिप बँड किंवा पार्टीवर होणारा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा झालेल्या मैत्रीदिनाने मैत्रीचा अर्थ समृद्ध केला.

 

सोशल मीडियावरही क्रेझ

सोशल मीडियावरही दिवसभर मैत्रीदिनाचे वातावरण रंगले होते. आयुष्यभरासाठी मैत्रीचे ऋणानुबंध जपताना व्हॉट्सअॅप स्टेटस, रील्स आणि भावनिक संदेश मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले.

 

 

🤙 8080365706