कोल्हापूर :स्टार्टअप हब अशी कोल्हापूरची ओळख निर्माण करूया, असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

शाहू साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राजे समरजितसिंह घाटगे यांनी नुकतीच ‘राजर्षी शाहू स्टार्टअप मिशन’ची घोषणा केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवत्तावान युवकांना स्थानिक पातळीवर व्यवसाय व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देत यशस्वी नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने या मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर या मिशनच्या शुभारंभच्या निमित्ताने राजे समरजितसिंह घाटगे यांनी सिद्धम इनोव्हेशन अँड बिझनेस इनक्युबेशन सेंटरला भेट देऊन स्टार्टअप क्षेत्रातील विविध यशस्वी उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापुरात स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कोल्हापूरच्या युवकांमध्ये मोठी गुणवत्ता, कल्पकता आणि क्षमता आहे. मात्र योग्य संधी आणि व्यासपीठाच्या अभावामुळे अनेक युवक पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे वळतात. ही परिस्थिती बदलून कोल्हापुरातच युवकांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राशी जोडणी आणि आवश्यक पाठबळ मिळावे, या उद्देशाने ‘राजर्षी शाहू स्टार्टअप मिशन’ची संकल्पना पुढे नेण्यात येत आहे.या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सिबीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दोडमिसे यांनी सिबीकच्या माध्यमातून स्टार्टअप्सना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.या माध्यमातून स्टार्टअप्सना इनक्युबेशन, अॅक्सिलरेशन, को-वर्किंग सुविधा, इनोव्हेशन लॅब, उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शन, सीड फंडिंगसाठी सहाय्य तसेच तंत्रज्ञान विकासासाठी मदत उपलब्ध करून दिली जाते. तसेच स्टार्टअप्सना व्यवसायाच्या विविध टप्प्यांवर आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी सिबीकचे व्यवस्थापकीय संचालक पारस ओसवाल, संचालक प्रतीक ओसवाल, संचालिका सौ. सुनंदा दोडमिसे यांची उपस्थिती होती.
या संवादामध्ये विविध स्टार्टअप्सचे प्रतिनिधी विश्वजीत खाडे, प्रतीक पवार, अमोल काळुगडे, संकेत वाठारे, सचिन माने, सिद्धेश काटकर पलाश घोटणे, यश पोळ आदींनी सहभाग घेतला.
नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या आर्थिक, तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि बाजारपेठेशी संबंधित अडचणी, तसेच या अडचणींवर मात करून स्थानिक युवकांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
कोल्हापुरातील स्थानिक प्रतिभा, नवकल्पना आणि उद्योजकतेला योग्य दिशा देऊन कोल्हापूरला एक सक्षम आणि प्रभावी स्टार्टअप हब म्हणून विकसित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज यांचा कोल्हापूर संस्थानमधील उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्याचा वारसा सहकारमहर्षी दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यासह ग्रुपमधील विविध संस्थांच्या माध्यमातून चालविला. नोकरी करणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे तरुण घडविण्यासाठी आम्हीही सातत्याने विविध उपक्रम राबवित आहोत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील स्टार्ट अपना प्रोत्साहन देण्यासाठी या मिशनचा शुभारंभ केला आहे. असे प्रतिपादन राजे समरजिथसिंह घाटगे यांनी यावेळी केले.
