मुंबई : मालेगाव (जि. नाशिक) शहरात शासकीय जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करांनी तलाठ्यावर केलेला प्राणघातक हल्ला याबाबतीत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कारवाई करण्यासह महसूल अधिकाऱ्यावर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथके स्थापन करण्याबाबत व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळात उपस्थित केला.

या प्रश्नावर लेखी उत्तर देताना महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी, शासकीय जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे लेखी उत्तर दिले.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मालेगाव (जि. नाशिक) शहराला लागून असलेल्या सायने बुद्रुक शिवारात शासकीय जमिनीवर होणारे अवैध गौण खनिज चोरी व अवैध ब्लास्टिंग रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन चिरडण्याचा प्रयत्न माहे मे, २०२६ मध्ये केला असल्याचे निदर्शनास आले आहे. उक्त शहरात शासकीय जमिनीवर अवैध ब्लास्टिंग व गौण खनिज चोरी बऱ्याच वर्षापासून सुरू असल्याने गौण खनिज आणि महसूल व खनिकर्म विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने संबंधितांवर कारवाई करण्यासह महसूल अधिकाऱ्यावर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथके स्थापन करण्याबाबत व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
यास लेखी उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, दिनांक ८ मे, २०२६ रोजी मौजे सायने बुद्रुक येथील तलाठी श्री गोविंद मारुती तिडके हे त्यांचे सहकारी तलाठी श्री. मनोज खरोटे व श्री. किशोर थोरात यांच्यासह शासकीय कार्यक्रमासाठी जात असताना प्रवासादरम्यान, सायने बु शिवारातील शासकीय मालकीच्या ग.नं. २७५ राखीव वनामध्ये एक विना क्रमांकाचा महिंद्रा ट्रॅक्टर ब्लास्टिंगद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन करताना आढळल्याने चौकशी केली असता, ट्रॅक्टर मालक श्री. पुरभाजी रामदास गायकवाड याने शासकीय कामात अडथळा आणून चालकाला चिथावणी दिली व ट्रॅक्टरचालक श्री. पवनकुमार हुसेन आप्पा याने ट्रॅक्टर तलाठी श्री गोविंद तिडके यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला व चालू ट्रॅक्टरसह फरफटत नेले. या गंभीर कृत्यामुळे श्री. तिडके यांच्या उजव्या हातास आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटनेबाबतची मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये FIR क्र. ०४०८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामिण यांना संबंधितावर तात्काळ अटक करुन दोषारोप पत्र तात्काळ दाखल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच तहसीलदार मालेगाव यांनी याप्रकरणी दंडात्मक कार्यवाही केलेली आहे. तसेच सदर घटनेपूर्वी अन्य प्रकरणी मौजे सायने बु येथुन अवैध मुरुम उत्खनन बाबत कारवाई करुन सुजल प्रभाकर सोनवणे यांचेकडुन रु.१,०८,८८८/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करून शासन जमा करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणामध्ये ३९ कारवाया करण्यात आलेल्या असुन त्यामध्ये रक्कम रु.५०,०१,२५२/- एवढी दंडाची आकारणी केलेली आहे. तसेच १० फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच गौण खनिजांचे अनिधिकृत उत्खनन, वापर व वाहतूक प्रकरणी विविध कायदे/अधिनियम/नियम यान्वये फौजदारी कारवाई करण्याबाबत दिनांक ११ जुलै, २०२५ च्या परिपत्रकान्वये सूचना क्षेत्रीय यंत्रणेला निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिली.
