कागलच्या श्रीराम मंदिरमधील कौटुंबिक नाती जपण्यासाठीच्या संवाद सत्राला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिजाऊ महिला समिती व राजे फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

कागल:राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने “संवादातून नाती खुलवूया” हे विशेष मार्गदर्शन सत्र मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात श्री राम मंदिर, कागल येथे पार पडले.त्यास महिलांची लक्षणिय उपस्थिती होती.

 

आई–मुले तसेच आजी–नातवंडे यांच्यातील नात्यांमध्ये संवादाचे महत्त्व, भावनिक समज, पिढ्यांतील दुरावा कमी करणे आणि कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सौ. केतकी म्हस्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि कुटुंबातील नातेसंबंध टिकवण्यासाठी आवश्यक असलेले मानसशास्त्रीय पैलू सखोलपणे उलगडून सांगितले.ऐकून घेणे, समजून घेणे आणि सकारात्मक संवाद हेच नात्यांचे खरे बळ आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले.

 

राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या, आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील संवाद कमी होत चालला असून अशा मार्गदर्शन सत्रांमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते.लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात.त्यामुळे त्यांच्यावर लहान वयातच चांगले संस्कार कृतीतून करण्याची गरज आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.संवाद, प्रश्नोत्तर आणि अनुभव शेअरिंगमुळे संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी बनले.

 

व्यासपीठावर कागल नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका बारड,नगरसेविका साधना पाटील,मेघा माने,राजे बँकेच्या संचालिका नम्रता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

🤙 8080365706