मुंबई:- नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय संबंधित कंपनी देखील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
