मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश

कोल्हापूर: मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या संशोधन मंचाने सन २०२४ ची विविध विषयांतील जागतिक आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये डॉ. पाटील मटेरियल सायन्समधील संशोधनात देशात नवव्या स्थानी आहेत.

मटेरियल सायन्समधील संशोधनाच्या अनुषंगाने प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचे विविध संशोधकीय निर्देशांक हे खूप उच्च दर्जाचे आहेत. त्यांच्या संशोधनाचा एच-इंडेक्स ९४, आय-१० इंडेक्स ५४० तर डी-इंडेक्स ८८ इतका आहे. त्यांचे ६०० हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून प्रसिद्ध झाले असून त्यांच्या संशोधनास ३३,८८० सायटेशन्स मिळाली आहेत. अर्थात तितक्या संशोधकांनी डॉ. पाटील यांच्या शोधनिबंधांचे संदर्भ आपल्या संशोधनात दिले आहेत. रिसर्च डॉट कॉमने सन २०२४मध्ये विषयनिहाय जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये डॉ. पाटील यांना मटेरियल सायन्समध्ये देशातील पहिल्या १० संशोधकांमध्ये आणि जागतिक स्तरावर १५१२ वे स्थान प्राप्त झाले आहे. डॉ. पाटील यांचे सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण संशोधन यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीतही त्यांचे स्थान खूप वरचे आहे, तर ए.डी. सायंटिफिक निर्देशांक आकडेवारीतही त्यांचा समावेश आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक असून त्यांनी मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून उत्कृष्ट अध्यापन व संशोधन करीत आहेत. डॉ. पाटील यांचे संशोधन प्रामुख्याने नॅनोमटेरियल्स (nano-materials), थिन फिल्म्स (thin films) आणि ऊर्जा साठवणुकीच्या (energy storage) क्षेत्रात आहे. ही क्षेत्रे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अत्यंत मूलभूत मानली जातात आणि त्यांचा दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पडतो. त्यांच्या संशोधनाचा उपयोग सौर ऊर्जा (solar energy), बॅटरीज (batteries) आणि सेन्सर्स (sensors) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या उपकरणांमध्ये होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये जर्मनीची डॅड फेलोशिप, इंग्लंडची इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सची फेलोशिप व दक्षिण कोरियाची ब्रेन पूल यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने २०१४ मध्ये गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया, अलाहाबाद आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांचे ते फेलो आहेत. त्यांची चार आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या नावावर सात पेटंटही आहेत.

🤙 9921334545