कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान, ईव्हीएमवरील मतदान, यामध्ये फरक आढळल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी उमेदवारांना ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीच्या मागणीसाठी अर्ज करण्यास शुक्रवारी (दि. 29) पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील मतदान केंद्रांवरील 44 मतदान ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी होणार आहे. या मतदारसंघांतील उमेदवारांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे तशी लेखी मागणी करण्यात आली आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ही तपासणी आणि पडताळणी होणार आहे.
चंदगड मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएमच्या तपासणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार नंदाताई बाभुळकर यांच्या वतीने, कोल्हापूर दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या वतीने 10, करवीरमधील 14 केंद्रांवरील ईव्हीएमबाबत काँग्रेसचे राहुल पाटील यांच्या वतीने, कोल्हापूर उत्तरमधील महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर यांच्या वतीने 10, तर हातकणंगलेमधील काँग्रेसचे राजू आवळे यांच्या वतीने 10 केंद्रांवरील ईव्हीएमच्या तपासणीची मागणी केली आहे.
आयोगाकडून ईव्हीएमबरोबर काही छेडछाड झाली आहे का, याची तपासणी होणार आहे. त्याकरिता मॉकपोल घेऊन मते बरोबर पडतात की नाही, हे तपासले जाणार आहे. याकरिता मशिनमधील सर्व डेटा काढून टाकला जाणार आहे. यालाच आक्षेप आहे, मुळात हा डेटा आणि कागदोपत्री डेटा तपासण्याची मागणी आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले. मात्र, त्याची प्रक्रिया न दिल्याने, आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केली, तीच आक्षेपाला बगल देणारी असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.