महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ‘आप’ चा पाठिंबा

कोल्हापूर (सोमनाथ जांभळे)

ज्यांनी षडयंत्र रचून राज्यातील उद्योगधंदे गुजरातला घालवले अशा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन करत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व दहा मतदारसंघातील उमेदवारांना आम आदमी पार्टीने पाठिंबा जाहीर केला.

 

 

महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार करण्यासाठी दोन प्रादेशिक पक्षांना फोडण्यात आले. यावेळी साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर करण्यात आला. हा फक्त पक्ष फोडण्यापुरता मर्यादित विषय नव्हता, तर महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रकार होता. तसेच टाटा एअरबस, वेदांता फोक्सकॉन, डायमंड मार्केट यासारखे उद्योग गुजरातला घालवून महायुती सरकारने राज्यातील जनतेशी बेईमानी केली. अशा महाराष्ट्रद्रोही सरकारला पायउतार करण्याचे आवाहन आप चे प्रदेश संघटन सचिव संदिप देसाई यांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी उच्चांक गाठला आहे. सोयाबीन, कापूस, टोमॅटो याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला. अतिवृष्टी, अवकाळी पावसाने आलेल्या असमानी संकटात बाहेर पडण्यासाठी लागणारी मदत अद्याप त्यांना मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे धसका घेत वारेमाप खर्चाच्या योजना आणून राज्यातील जनतेला भुलावण्याचे काम महायुती सरकारने केले. परंतु ऐन दिवाळीत झालेली महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे मध्यमवर्ग पिचलेला आहे.

भाजपने ज्याप्रकारे तपास यंत्रणांचा गैरवापर केला त्यामध्ये राज्यातील गृहखात्याचा देखील समावेश आहे. वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज तस्करी यामुळे राज्यातील कायदा सुव्यववस्था बिघडली असताना महायुती सरकार विरोधकांना त्रास देण्यात मशगुल होते.

या सर्व पार्श्वभूमीवर आप चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जोमाने करणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न असल्याचे जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, सुदर्शन कदम, सी व्ही पाटील, समीर लतिफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मयूर भोसले, रमेश कोळी, स्वप्नील काळे, शशांक लोखंडे, प्राजक्ता डाफळे आदी उपस्थित होते.

🤙 9921334545