भौतिकशास्त्र अधिविभागातील नवनाथ चव्हाण नेट परीक्षेत देशात तिसरे

कोल्हापूर: एनटीए व सीएसआयआर यांच्या वतीनं देशस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा म्हणजेच नेट परीक्षेचा निकाल (दि. १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी) जाहीर करण्यात आला आहे. एनटीए व सीएसआयआर ने परीक्षा २५ जुलै, २०२४ रोजी आयोजित केली होती. सदर परीक्षा २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. नेट परीक्षेत शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागामधील माजी विद्यार्थी नवनाथ काशिनाथ चव्हाण यांनी देशात तिसरे येऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे.
 त्यांचे पदव्युत्तर शिक्षण भौतिकशास्त्र अधिविभागामध्ये २००९ साली पूर्ण झाले. सध्या ते प्रा. डॉ. आर. के. निमठ यांच्याकडे संशोधन करत आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स अधिविभागात कार्यरत आहेत. नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी नवनाथ चव्हाण यांचे अभिनंदन केले. नेट परीक्षेसाठी भौतिकशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक, आई, वडील, पत्नी व मुलगा यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाल्याचे नवनाथ चव्हाण यांनी नमूद केले. भौतिकशास्त्र अधिविभाग हा विद्यापीठातील शैक्षणिक व संशोधनामध्ये अग्रेसर अधिविभाग आहे.
अधिविभागातील ‘भौतिकशास्त्र उपकरण सुविधा केंद्रातील’ (पीआयएफसी) अत्याधुनिक उपकरणांच्या सुविधेमुळे संशोधनासाठी नेहमीच पुढे आहे, त्यामुळे विद्यार्थी भौतिकशास्त्र अधिविभागाला पसंती देतात. अधिविभागातून बाहेर पडलेले विद्यार्थी जगभरात संशोधन क्षेत्रात आघाडीवर आहेत. अधिविभागामध्ये विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच अधिविभागामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले जाते. अधिविभागातील प्राध्यापकांचा संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक आहे.
 शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले.