नवी दिल्ली: अदानी-हिंडेनबर्ग खटल्यावरील सर्वोच्च न्यायालयाने 3 जानेवारीला दिलेला निर्णय गौतम अदानी यांच्यासाठी वरदान ठरला आहे. नवीन वर्षाच्या तिसर्या दिवशी, अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.त्यामुळे गौतम अदानी एका दिवसात सर्वाधिक संपत्ती मिळवणारे अब्जाधीश बनले आहेत.
फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत, गौतम अदानी यांनी एका दिवसात नफा मिळवण्यात सर्वांना पराभूत केलंय. एका दिवसात संपत्ती मिळवण्यात एलोन मस्कचाही पराभव केला आहे. एका दिवसात नेमकं काय घडलं ज्यामुळे गौतम अदानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनाही टक्कर दिली.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील तपासाचे अधिकार सेबीकडून घेतले जाणार नाहीत किंवा त्याचा तपास एसआयटीकडे हस्तांतरित केला जाणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल बुधवारी दिला. न्यायालयाने सांगितले की, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर सेबीच्या आतापर्यंतच्या तपासावर ते समाधानी आहेत आणि 24 पैकी 22 प्रकरणांमध्ये आतापर्यंतच्या तपासात कोणतीही अनियमितता आढळली नाही. बाजार नियामक सेबीला उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी 3 महिन्यांसाठी अधिक वेळ देण्यात आला होता. या बातमीच्या प्रभावामुळे, अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये काल हजारो कोटी रुपयांची वाढ झाली आणि एका दिवसात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3.6 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवली गेली.
एलोन मस्क आणि मुकेश अंबानी यांना मागे टाकले –
फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार आज सकाळी गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 16 व्या स्थानावर आहेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 12 व्या स्थानावर आहेत. आता कालच्या सर्व आकड्यांवर नजर टाकली तर गौतम अदानी कमाईत सर्वात पुढे दिसून आले आहेत. एका दिवसात कमाई करण्यात अदानी यांनी सर्वांनाच मागे टाकले. हा सर्व न्यायालयाच्या निकालाचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
फोर्ब्सच्या अब्जाधीशांची यादी –
फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी $99.6 अब्ज संपत्तीसह 12 व्या स्थानावर आहेत आणि कालच्या व्यापारात त्यांची एकूण संपत्ती $983 दशलक्षने कमी झाली आहे. एकूण निव्वळ संपत्तीत ही 0.98 टक्क्यांची घसरण आहे. 66 वर्षीय मुकेश अंबानी अजूनही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स ग्रुपचे मालक आहेत.
गौतम अदानी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत 16 व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती $77.4 अब्ज आहे. कालच्या व्यापारात त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये $3.6 अब्जची वाढ नोंदवली गेली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ही 4.90 टक्क्यांची वाढ आहे. 61 वर्षीय गौतम अदानी यांचे व्यवसाय साम्राज्य भारतातील पायाभूत सुविधा, कमोडिटी आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे आणि ते अदानी समूहाचे मालक आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कला कसे मागे टाकले –
इलॉन मस्क फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत 244.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. कालच्या व्यापारात त्यांची एकूण संपत्ती $7.1 बिलियनने घसरली, जी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 2.84 टक्क्यांनी घसरली आहे. 52 वर्षीय अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असू शकतात, परंतु भारताच्या गौतम अदानी यांनी काल त्यांना एका दिवसात संपत्ती मिळवण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. टेस्ला आणि SpaceX चे मालक इलॉन मस्क यांनी 7.1 अब्ज डॉलरची संपत्ती गमावली आहे, तर गौतम अदानी यांनी त्यांच्या उत्पन्नात 3.6 अब्ज डॉलरची भर घातली आहे.
एका दिवसाच्या कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी सर्व अब्जाधीशांना मागे टाकले असून भारतीय उद्योगपतीने जगातील सर्व देशांतील श्रीमंतांना शर्यतीत पराभूत केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.