सर्वसामान्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेसला साथ द्या : सतेज पाटील

आजरा : देशात जातीय व्देष पसरवून राजकारण करणाऱ्या भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याची हीच वेळ आहे जनतेने जागृत रहावे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

आजरा तालुक्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.आजरा शहरातील संभाजी चौकात झालेल्या सभेत सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. प्रास्ताविक नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो धर्तीवर ही पदयात्रा निघाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केवळ स्वप्ने विकायचे काम केले आहे. दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत.यावेळी गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, बाजीराव खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, आजऱ्यातील प्रतिसादाने मला एक नविन उर्जा मिळाली आहे.अच्छे दिनाची आश्वासने दिली मात्र ती पूर्ण केलेली नाही. केवळ भुलभुलैयेचे वातावरण आहे. सर्वसामान्यांपेक्षा उद्योगपतींचा फायदा मोदी सरकारने केला आहे.12 लाख कोटींची उद्योगपतींची कर्जे माफ केली आहे. कोविडमध्ये केंद्राने लोकांना वाऱ्यावर सोडले.भांडी वाजवून व मेणबत्या लावून जगात हसे करून घेतले. महाविकास आघाडीमुळे आपले राज्य कोरोनातून वाचले.गेली कित्येक महिने मणिपूर जळतो आहे मात्र मोदी बोलत नाहीत.या भाजपने देशाला वेगळ्या दिशेला नेले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,आत्मविश्वास नसल्याने शिवसेना, राष्ट्रवादी फोडून राज्य करीत आहेत.जाती धर्मामध्ये तेढ लावून व तरुणांची माथी भडकवण्याचे काम भाजप करीत आहे. जनतेला आता ही भाजपची रणनीती समजली आहे. तरुण व समाजाने सावध रहाणे आवश्यक आहे. बंधुभावाने रहात ही खेळी अपयशी करावी असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात कॉंग्रेसला एकसंघ ठेवून पक्षाची ताकद वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जयवंतराव शिंपी, संग्राम नलवडे, बशीर खेडेकर, नगरसेवक किरण कांबळे, सुमैय्या खेडेकर, संजय सावंत, युनुस माणगांवकर, सचिन शिंपी, नामदेव नार्वेकर यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706