सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार…..

दिल्ली : भारताच्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार आहे.

विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपसारखे देशही भारताच्या या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. चांद्रयान-3चे सिग्नल पकडण्यासाठी या दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था इस्रोला मदत करत आहेत.चांद्रयान-3 चंद्राच्या त्या भागात उतरणार आहे, जिथे नासा देखील अजून पोहोचलेली नाही. रशियाचं लूना-25 चांद्रयान-3 च्या आधी दक्षिण ध्रुवावर उतरेल, अशी अपेक्षा होती. परंतु लँडिंगपूर्वीच त्याचा अपघात झाल्यामुळे भारत आता या शर्यतीत एकटाच आहे. चांद्रयान-3 नंतर नासाची आर्टेमिस आणि युरोपियन स्पेस एजन्सी चांद्र मोहीम आखणार आहेत. त्यामुळेच दोन्ही अंतराळ संस्थांच्या सगळ्या आशा चांद्रयान-3 वर टिकून आहेत.