
कोल्हापूर : १७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ही मुले कोणत्याही कागदपत्रांशिवाय बंगाल ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर कशी काय येऊ शकली ? इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना शयनयान तिकीट कसेकाय मिळाले आणि या प्रवासात त्यांना तिकीट तपासनीसाने त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली नाही का ? तरी हा सर्व प्रकार गंभीर असून धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली जिल्ह्यांर्तगत काय प्रकार घडत आहेत यासाठी ‘विशेष पथका’च्या माध्यमातून अन्वेषण करा, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की१. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच गणवेशात आजरा येथील मदरसा येथे नेण्याचे कारण काय ? २. अशा मुलांना या अगोदर किती वेळा आणि कोणत्या मदरशांमध्ये आणले गेले आहे, याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे. ३. तरी या प्रकारासाठी उच्चस्तरीय ‘विशेष पथकाच्या माध्यमातून अन्वेषण होणे आवश्यक आहे.
