
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्यासमोर पार पडली. विरोधी आघाडीने आक्षेप घेतलेले जवळपास १८०० सभासद यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक सभासद शेतकऱ्यांनी विरोधकांच्या हरकतीबद्दल संताप व्यक्त केला. कारखान्याच्या स्थापनेपासून आम्ही सभासद आहोत आणि नेमकं याच वेळेला आम्ही बोगस असल्याचा साक्षात्कार विरोधकांना कसा झाला? असा संतप्त सवाल यावेळी सभासदांनी केला.

केवळ राजकारण आणि सूडबुद्धीने चांगल्या कारखान्याला बदनाम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला. कारखान्याच्या मतदार यादीवर दोन्ही बाजूंनी जवळपास १९ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. या सर्व हरकतींवर बुधवारी सायंकाळपर्यंत सुनावणी चालली. या सुनावणीचा निकाल शुक्रवारपर्यंत लागण्याची शक्यता आहे. यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
चौकट – सर्जेराव माने यांनी यापूर्वीच्या निवडणुका महाडिक गटाकडून लढवल्या, तेव्हा आमच्या मतावरच ते चेअरमन झाले.आता विरोधी गटासोबत गेल्यानंतर माने सरांना आम्ही बोगस वाटू लागलो का? असा थेट सवाल यावेळी सभासदांनी केला. एकंदरीतच राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा विरोधकांसाठी चिंतेची बाब बनला आहे.
