कागल : प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा कळवळा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय. आत्ता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर के. डी. सी. सी. बँकेमार्फत ठराव करणे म्हणजे गेली अडीच वर्षे झोपा काढीत होता का? सरकारमध्ये असताना अशा पद्धतीने जिल्हा बँकेत ठराव केला असता तर त्यांचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा लक्षात आला असता, असा खरमरीत सवाल समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे,गेल्या अडीच वर्षात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरती होते. आघाडी सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे तीन वेळा जाहीर केले. अनुदान जाहीर केल्यानंतर अनेक जाचक अटी महाआघाडी सरकारनेच घातल्या. या अनुदानाच्या निकष प्रक्रियेमध्ये माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आघाडीवर होते. त्यावेळी या अनुदानापासून कोरोनामुळे 2019/20 मधील 12 हजार 88 शेतकरी वंचित राहणार आहेत याचा साक्षात्कार त्यांना झाला नाही का ?
मागील अडीच वर्षे सरकारमध्ये असणाऱ्या मुश्रीफांनी अनेक अटी व शर्ती लावत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून घेणारे मुश्रीफ विनाअट प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी मंत्रिमंडळात किती वेळा आवाज उठवला?
सरकार बदलल्यानंतर त्यांनी दिखाव्यासाठीच हा जिल्हा बँकेचा ठराव केला आहे. आघाडीचे सरकार गेल्यामुळे मुश्रीफांनी जिल्हा बँकेच्या सभेत ठराव करून शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवले आहे.
आमदार हसन मुश्रीफ यासाठी आत्ता पाठपुरावा करणार म्हणतात ते धांदात लोकांची दिशाभूल करतात. ते स्वतः निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत असताना शेतकऱ्याबद्दल चांगला निर्णय घेऊ शकले नाहीत.ते आत्ता काय करणार ?असेही प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे
