लोकनगरी गृहप्रकल्पाला दुसऱ्यांदा ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट‘ पुरस्कार

कोल्हापूर : दर्जेदार बांधकाम आणि सर्वसुविधायुक्त गृहप्रकल्पाची उभारणी ही कोल्हापुरातील रामसिना ग्रुपची विशेष ओळख समजली जाते. वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचनेमुळे बांधकाम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या रामसिना ग्रुपच्या ‘लोकनगरी’या गृहप्रकल्पाला केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र २०२२’(सर्टिफिकेट ऑफ मेरिट) जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या या गृहप्रकल्पाला दुसऱ्यांदा ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’ जाहीर झाले आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत  देशभर सर्वत्र गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. केंद्रिय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयातर्फे अशा प्रकल्पांची विविध पातळीवर तपासणी होते. त्यातील निवडक गृहप्रकल्पांना गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) प्रदान केले जाते. त्यानुसार यंदा,  ‘पी.एम.ए.वाय. एमपॉरिंग इंडिया अॅवार्डस २०२२’चे वितरण होणार आहे. या पुरस्कारांच्या विजेत्यांच्या यादीमध्ये  रामसिना ग्रुपच्या ‘लोकनगरी’गृहप्रकल्पाचा समावेश आहे. संपूर्ण राज्यभरातून पुरस्कारप्राप्त हा एकमेव गृहप्रकल्प आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून प्राप्त झाले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय भारत सरकारच्या अभियान संचालक, निवड समिती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ होणार आहे. केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे १० मे 2022 रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.  

 केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या समितीकडून डिसेंबर २०२१ मध्ये या प्रकल्पाची तपासणी झाली होती. तत्पूर्वी या पुरस्काराच्या नामांकनासाठी रामसिना ग्रुपतर्फे लोकनगरी गृहप्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केला होता. हवामानपूरक प्रकल्प, उत्तम रचना, पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आवश्यक साधन सुविधा, सुरक्षितता, आयएसआय गुणवत्ता प्रमाणपत्र बांधकाम साहित्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उतारमार्गची सोय, वृक्षारोपण, हरितव्यवस्था  सौरउर्जा, भूंकपरोधक संरचना, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, तंत्रज्ञानावर आधारित  कार्यक्षम सामाईक प्रकाश व्यवस्था आणि स्वयंमपातळी मापन आधारित पाणी टाकी भरण्याची व्यवस्था या निकषांच्या आधारे तज्ज्ञ समितीकडून पडताळणी होते.

या गृहप्रकल्पात एकूण २५० सदनिका आहेत. प्रकल्पाची बांधणी करताना प्रत्येक घटकाचा विचार केला होता. सदनिकांची रचना, पार्किंग व्यवस्था, नागरिकांसाठी सोयी सुविधा, सुरक्षिततेला प्राधान्य आणि पर्यावरणपूरक प्रकल्प याकडे विशेष लक्ष दिले होते. कोल्हापुरातील गृहप्रकल्पास देशपातळीवरील मानाचा पुरस्कार मिळाल्याने  कोल्हापूरचे नाव सर्वत्र उंचावले. या पुरस्काराच्या निमित्ताने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

  • सचिन ओसवाल, चेअरमन रामसिना ग्रुप