कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खूशखबर आहे. शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक जाहीर केलेले अनुदान लवकरच संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार असून त्याची युद्धपातळीवर तयारी सुरु आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकरऱ्यांसाठी 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदान योजनेची राज्य सरकारने घोषणा केली होती. दोन वर्षापासून प्रतिक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या घोषणेमुळे दिलासा मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तवेर आल्यावर महात्मा जोतीबा फुले कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. पिकांसाठी अल्पमुदतीचे ज्यांनी कर्ज घेतले आहे. त्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहेत, त्यांना ५० हजार रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा करून योजनेसाठी निधीची तरतुदही केली होती. मात्र शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहोचली नव्हती.
आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी बँका व सेवा संस्थाकडून शेतकऱ्यांची तातडीने माहिती मागवण्यात आली आहे. यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली असून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. शासनाने दि. ५ मे २०२२ रोजी आदेश काढून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची तातडीने माहिती मागवली असून बँका, सहकारी संस्थातील कर्मचारी कामाला लागले आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी रक्कम कधीपासुन वाटप करावयाची या बाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नियमीत कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान शासनाकडून मिळणार असल्याने कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून लवकरच नियमीत कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार अनुदान मिळणार आहे.