पाचशेच्या रद्द झालेल्या नोटा अंबाबाईच्या दानपेटीत

कोल्हापूर : भाविकांकडून देवीची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दानपेटीत चलनात नसलेल्या ५०० रुपयांच्या सापडल्या आहेत.

अंबाबाईच्या मंदिरात असलेल्या दानपेटीत भक्त भक्तीभावाने दान अर्पण करतात. या दानपेटीतील दानाची सध्या मोजदाद सुरू आहे. यात भाविकांनी रोख रक्कम, दागिने, परदेशी चलन असे सढळ हाताने अंबाबाईला दान दिले आहे. मात्र एक विचित्र घटनाही उघडकीस आली आहे. येथे येणाऱ्या भाविकांनी दानाच्या स्वरुपात जुन्या बंद पडलेल्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत. नोटबंदीला साडेपाच वर्ष होत आली असताना देखील काही दानशूर भाविकांनी बंद पडलेल्या ५०० रुपयांच्या नोटा टाकल्या आहेत.

देशातून काळा धन हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत जुन्या नोटांना बँकेत बदलण्याचा कालावधी दिला होता. मात्र साडेपाच वर्षांनंतरही बंद झालेल्या नोट्या आढळल्या आहेत. जुन्या बंद पडलेल्या नोटा स्वत:जवळ बाळगणे हा आता गुन्हा असून, त्या कारणानेच काही जणांना आपल्या जुन्या नोटा अंबाबाईच्या दानपेटीत टाकल्या आहेत. हा प्रकार म्हणजे देवीची फसवणूक केल्यासारखेच आहे.

याबाबत बोलताना देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे म्हणाले, नोटबंदी झाल्यापासून अशा नोटा दानपेटीत सापडत आहेत. या नोटांचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे भाविकांनी चांगल्या मनाने दान करावे.

.