रश्मी शुक्लांविरुद्ध ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल : नाना पटोले

मुंबई : बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. कोणाच्या वक्तिगत जीवनात जाऊन त्यांना त्रास देणे, ब्लॅकमेल करणे ही पद्धत बंद झाली पाहिजे व या संपूर्ण षडयंत्रामागे कोण कोण आहेत ते स्पस्ट झाले पाहिजे यासाठी ही याचिका दाखल केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला ह्या पुणे पोलीस आयुक्त असताना २०१६-१७ साली माझ्यासह काही राजकीय नेते व अधिकारी यांचे फोन बेकायदेशिरपणे टॅप करण्यात आले. माझे नाव अमजद खान ठेवून मी अमली पदार्थांचा व्यापर करतो असे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. विधानसभेत मी हा प्रश्न उपस्थित केला असता त्याच्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढलेल्या असून सध्या त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असले तरी माझ्या वैयक्तिक व सार्वजनिक प्रतिमेचे मोठे नुकसान झाले असून ते कधीही भरून येमारे नाही, मी कायदेशीर मार्ग अवलंबत ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.