पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

कोल्हापूर : रंगपंचमी साजरी करुन शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेल्यावर बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज दुपारी सापडले. गुरुप्रसाद गजानन झगडे (वय ३३, रा. शनिवार पेठ) व सुनील सुरेश शिंदे अशी त्यांची नवे आहेत.

   शिंगणापूर (ता. करवीर) बंधाऱ्या दोन तरुण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांना बंधाऱ्यावर तरुणाचे कपडे, मोबाईल, चप्पल व मोटरसायकल आढळली होती. मोबाईलची रिंग वाजल्याने पोलिसांनी फोन उचलला असता त्या व्यक्तीचा भाऊ बोलत होता. हा मोबाईल गुरुप्रसाद गजानन झगडे (वय ३३, रा. शनिवार पेठ) या आपल्या भावाचा असून तो रंगपंचमी खेळून मित्रांसमवेत आंघोळीला गेला होता. तो अजून परत आलेला नाही, असे त्याने सांगितले. तर यादवनगरमधील सुनील सुरेश शिंदे हा तरुणही अंघोळीसाठी या बंधाऱ्यावर गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नव्हता. नातेवाईक, मित्रांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला आहे. परंतु, तोही सापडला नव्हता. शिंगणापूर बंधारा येथे रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दलाकडून बुधवारी दिवसभर शोध मोहीम सुरू होती.

    गुरुवारी रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दलाने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. आज, गुरुवारी या दोन्ही तरूणांचे मृतदेह सापडले. सकाळी साडे आठ वाजता गुरुप्रसाद गजानन झगडे याचा मृतदेह सापडला. तर दुपारी एक वाजता सुनील सुरेश शिंदे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना लोकांना दिसला. दोन्ही मृतदेह करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.