‘साऊथ’च्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित RRR चित्रपट उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एका गाण्यात वीर मराठा शोले असं म्हणत रामचरण आणि ज्युनियर एनटीआरने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रातील प्रेक्षकाना प्रतिक्षा आहे.

दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा चित्रपट बनवला जात असून तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर, बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, आलिया भट्ट आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात ते थोर राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहत आहेत. हे गाणं आरआरआर सेलिब्रेशन अँथम आहे. या गाण्याच नाव ‘शोले’ आहे. या गाण्यात राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया पारंपारिक पोशाखात आहेत. त्या गाण्यात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून कलाकार आणि दिग्दर्शकांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. तर ‘वीर मराठा शोले’ असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयजयकार केला आहे.

या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई आणि इतर थोर राष्ट्रपुरुषांना श्रद्धांजली वाहिली आहे.