कोल्हापूर : पंधरा हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराने ट्रान्सफार्मर लोडिंग व अनलोडिंगची कामे केली होती. त्या कामांच्या बिलांच्या मंजुरीसाठी ते काशीदकर यांच्याकडे गेले होते. यावेळी काशीदकर याने त्यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सापळा रचला होता. त्यात पंधरा हजारांच्या लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन कुंभार, संजीव बंबर्गेकर, शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई, रुपेश माने यांनी केली.