करवीर तहसीलसमोरील रस्त्याची झाली गटारगंगा

कोल्हापूर: येथील भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसील कार्यालयासमोरील नाल्यातील सांडपाणी थेट रस्त्यावर आले आहे. सीपीआर हॉस्पिटलपर्यंत वाहत असल्याने या रस्त्याची गटारगंगा असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना एका हाताने नाक स्त दुसऱ्या हाताने पॅन्ट पकडून कसरत करत चालावे लागत आहे.

    गेल्या काही दिवसापासून करवीर तहसील कार्यालय ते सीपीआर हॉस्पिटल या रस्त्यावर ड्रेनेज लाईन तुंबल्याने या भागातील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे‌. याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, टेलीफोन कार्यालय, सीपीआर हॉस्पिटलसह, अनेक कार्यालये, व दुकाने आहेत. त्यामुळे येथे नेहमीच मोठी वर्दळ असते.त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने सांडपाण्यातच पार्किंग करावी लागत आहेत. नागरिकांना आपली वाहने पार्किंग करण्यासाठी अन्यत्र जागा नसल्यामुळे वाहने रस्त्यावरच पार्किंग करावी लागत आहे. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच सांडपाणी साठल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाही त्रास होत आहे. विशेषता महिला व वृद्धांना याचा जास्त त्रास जाणवतो.

याबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. जर शहरातील मुख्य रस्त्यावरील शासकीय कार्यालयात  अशी दुरवस्था असेल तर अन्यत्र नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल ?याची कल्पना केलेलीच बरी.