कोल्हापूर:गगनबावडा तहसीलदार कार्यालयाच्या *महसूल शाखेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कार्यालयातील महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

आगीत महसूल शाखेतील १ संगणक संच, प्रिंटर, इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि महत्त्वाचे फर्निचरपूर्णपणे जळून गेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आ. चंद्रदीप नरके यांनी भेट देऊन पाहणी केली.
या दुर्घटनेमुळे तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. दाखले, नोंदी आणि इतर महसूल विषयक कामे बंद आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेण्यात आली.
महसूल विभागाचे कामकाज लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे.
