कोल्हापूर: अंबप परिसरातील एका 13 वर्षीय मुलाचा खेळताना पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली आहे.

सातवीत शिकणारा धनराज राहुल माने हा मुलगा रविवारी गावाबाहेरच्या मैदानावर मित्रांसोबत खेळत असताना अचानक खाली पडला. पडल्यानंतर त्याला अंतर्गत इजा झाल्याचा संशय होता. त्यानंतर तो उठून नेहमीप्रमाणे घरी आला.
रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने त्याला गावातील डॉक्टरांकडे दाखवण्यात आले. सोमवारी सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हसरा आणि सर्वांशी मिळून-मिसळून राहणाऱ्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात मोठी बहीण, आई-वडील आणि आजी असा परिवार आहे.
पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
