“स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” मोहिमेचे आयोजन जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रम

कोल्हापूर:जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने दि. १ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन सौ. शिल्पा शशिकांत खोत, अध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “हवामान कृती” (Climate Action) अशी असून Mission LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील 4Rs — Refuse, Reduce, Reuse आणि Recycle तसेच ग्रे-वॉटर व्यवस्थापनातील 3Rs — Reduce, Reuse आणि Recharge या संकल्पनांचा प्रसार करण्यात येणार आहे. “कचऱ्यापासून संपत्ती” (Waste to Wealth), परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy), किचन गार्डन, वृक्षारोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे.

दि. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ संदर्भात ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार असून Bulk Waste Generators (BWGs) यांची ओळख, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, जुने कचरा डेपो नोंदणी, घराघरातून कचरा संकलन यासंदर्भात विशेष मोहिमा राबविण्यात येतील.

मोहिमेअंतर्गत पुढील उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत :

• घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती

• ग्रामपंचायत स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी व मूल्यमापन

• “माझे गाव, माझी जबाबदारी” जनसहभाग उपक्रम

• मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची (BWGs) ओळख

• प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, नुक्कड नाटके, स्वच्छता मोहिमा

• “एक पेड़ माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण अभियान

• विशेष ग्रामसभा आयोजन

दि. ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभेमध्ये मोहिमेतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व हवामान कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सर्व गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिल्या असून, मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती SBM(G)-IMIS पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

🤙 8080365706