तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक

कोल्हापूर: तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह इतर समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

 

 

 

 

या बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, ‘तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण’ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार व व्यवसायाकरिता ‘बीज भांडवल योजना’ राबविण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

 

तृतीयपंथीयांच्या आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवणे, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘पिंक रिक्षा’ उपलब्ध करून देणे, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे, यांसारख्या विविध योजनांवर गतीने काम करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी या वेळी दिले. याशिवाय, सर्व शासकीय यंत्रणांमध्ये तृतीयपंथीयांबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे आणि संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्यासाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

 

या बैठकीला भरोसा सेल प्रतिनिधी, मैत्री संघटनच्या मयूरी आळवेकर, तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या शिवानी गजबर, सुहासिनी देशमाने, कौशल्य विकास अधिकारी कौशल्या पवार, दिपा शिरपूरकर, सचिन हिरेमठ, वर्षा ओतारी, अविनाश भाले उपस्थित होते.

🤙 8080365706