कोल्हापूर:विविध कृषि योजनांच्या यशस्वी अम्मलबजावणीव्दारे शेतक-याच्या हित जोपासावे असे आवाहन आजच्या कृषि समिती सभेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषि समिती सभापती मा.श्री. तानाजी पाटील यांनी व्यक्त केला.

नव्याने गठीत झालेल्या या कृषि समितीची आज मासिक सभा जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहामध्ये पार पडली. जिल्हयातील तालुकानिहाय पेरक्षेत्र, पिक परिस्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत घ्यावयाच्या दक्षता, महाबीज कडील या खरीप हंगामात होणारी बियाणे उपलब्धतता, रासायनिक खत उपलब्धता, बफर स्टॉकबाबत केलेले नियोजन, जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत सन २०२५-२६ मधील बाबवार खर्च तसेच सन २०२६-२७ चे योजनानिहाय केलेले नियोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत झालेली आर्थिक, भौतिक साध्यता या विषयांवर समग्र चर्चा करणेत आली.
नाविण्यपूर्ण योजनांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे आजरा घनसाळ देशी वाण संवर्धन योजना पुढील ३ वर्षासाठी नव्याने प्रस्तावित करणेत आलेली असून यामध्ये आजरा घनसाळ शुध्द वाण निर्मितीसाठी एकूण २५ हक्टर क्षेत्रावर व एकूण १२५ जी आय मानांकन प्राप्त शेतक-यांकडे सुधारित भात पिक लागवड तंत्रज्ञानाने उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी आजरा येथे एक दिवस बळीराजासाठी या योजनेअंतर्गत सर्व अधिकारी बांधावर जावून या योजनेबाबत प्रचार व प्रसार करणार आहेत. चंदगड तालुक्यातील काजूस जी आय मानांकन प्राप्त होण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत अशी मागणी श्री. विलास नाईक, सभापती पंचासत समिती चंदगड यांनी केली. यास अपेक्षित तरतूद करणेच्या सुचना संबंधितांना दिल्या. मधुमक्षिकापालन योजनेअंतर्गत निधी खर्च व्हावा यासाठी नियोजन करावे, सुपरकेन नर्सरी निर्मितीसाठी अनुदान, ऊस पाचट अभियान या योजनांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमध्ये मिलींद कुरणे, सभापती शिरोळ, विक्रमसिंह पाटील, सभापती भुदरगड, राजेंद्र पाटील सभापती राधानगरी यांनी या चर्चेमध्ये भाग घेवून सहभाग नोंदविला.
