शाहूंच्या विचारांतून राज्याला दिशा देणारे आदर्श कार्य कोल्हापुरच्या भुमीत उभे करूया-राजे समरजितसिंह घाटगे हजारो शाहूप्रेमींच्या उपस्थितीत राधानगरी धरणस्थळी१५२ वी शाहू जयंती जल्लोषात साजरी

राधानगरी :

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषीविषयक विचारांपासून प्रेरणा घेऊन राज्याला दिशा देणारे आदर्श कार्य कोल्हापूरच्या भूमीत उभे करूया,”असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक राधानगरी धरणस्थळी आयोजित भव्य सोहळ्यात श्री. घाटगे बोलत होते. हजारो शाहूप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदितादेवी घाटगे तसेच राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते धरणातील जलपूजनाने झाली. वाद्यांच्या गजरात जलकलश मिरवणुकीद्वारे जयंतीस्थळी आणण्यात आले. मंत्रोच्चारात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचाही सन्मान करण्यात आला.

श्री.घाटगे म्हणाले, “राधानगरीतील हा जयंती सोहळा आता लोकोत्सव बनला आहे. शाहू महाराजांच्या जल व कृषीनितीचा वारसा पुढे नेत शेतीमध्ये ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सौरऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजे बँक व शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच शाहू महाराजांच्या महिला सक्षमीकरणाच्या विचारांना पुढे नेत राजे बँक आणि जिजाऊ समितीच्या माध्यमातून सौ. नवोदितादेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.”

यावेळी निगवे येथील शिवछत्रपती मर्दानी आखाडा पथकाने सादर केलेल्या थरारक मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

संभाजी आरडे यांनी स्वागत, तर स्वप्नील जरग यांनी आभार मानले.

‘हाच खरा शाहू धर्म’

“छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, शिक्षण, शेती, कला आणि क्रीडा या सर्वच क्षेत्रांत कोल्हापूर संस्थानाला देशात अग्रस्थानी नेले. शेतकरी, महिला आणि युवकांसह सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी आयुष्य वाहिले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा कृतीतून पुढे नेणे, हाच खरा ‘शाहू धर्म’ आहे,” असे प्रतिपादन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले

समता रॅलीतून शाहूंच्या कार्यासह विचारांचा जागर

 

शाहू महाराजांचे जन्मस्थळ कसबा बावडा येथून सकाळी हजारो मोटरसायकलस्वारांची भव्य समता रॅली राधानगरी धरणाकडे रवाना झाली. यशराजे घाटगे यांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन झाले. मार्गावरील गावागावांत रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शाहू महाराजांच्या कार्यासह विचारांचा जागर करणारा राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.

🤙 8080365706