मुंबई:राज्य परिवहन महामंडळामार्फत १३१० बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमिता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी करुन सदरची प्रक्रीया रद्द करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला होता.
राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. शासनाच्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रचलित पध्दतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पध्दत बंद करून सर्व विभागांची केवळ तीन समूहांमध्ये विभागणी करून प्रत्येक समूहात किमान ४००-४५० या प्रमाणे सात वर्षांसाठी १३१० बस गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील कंत्राटदार कंपनीने डिझेल खर्चासहित देण्यात आलेल्या दरापेक्षा बाहेरील राज्यातील कंपनीने डिझेल दर वगळून देण्यात आलेले दर जास्त असताना सुध्दा महामंडळाकडून राज्याबाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे.
शासनाने मान्यता दिलेल्या मूळ प्रस्तावामध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अटी व शर्ती मध्ये बदल करून तीन समूहांसाठी निविदा काढून त्या शासन मान्यतेविना महामंडळ स्तरावर अंतिम केल्याने डिझेलच्या खर्चाचा भार महामंडळावर पडला असून एकूण होणाऱ्या खर्चापेक्षा राज्य शासनाच्या वर्षभराच्या खर्चामध्ये रुपये २००० कोटींचा निधी जास्त खर्च होणार आहे त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी परिवहन विभागाच्या सचिवांकडे डिसेंबर, २०२४ मध्ये केली होती ,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बस घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली असल्याने या निर्णयास मुख्यमंत्र्यांनी जानेवारी २०२५ मध्ये स्थगिती देऊन परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे खरे आहे काय? असल्यास चौकशीच्या अनुषंगाने जास्तीचे दर आकारणी करण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करुन पुर्ननिविदा प्रक्रिया राबविण्याबाबत तसेच अनियमितता करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळामार्फत १३१० बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमिता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी करुन सदरची प्रक्रीया रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले.