कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, शुक्रवारी (दि. १७) साजरा होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव हे शहरवासियांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्साही सहभागाने हीच बाब अधोरेखित केली.
आज सकाळी कमला महाविद्यालय येथे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा यांसह राजर्षी शाहू ग्रंथ, आधुनिक विज्ञानाविषयीचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. तेथून टाळमृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानासह वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहात होता.
ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव, डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. आर.जी. कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उप-ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, अजित चौगुले, डॉ. वैभव ढेरे, अभिजीत रेडेकर, डॉ. प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील यांच्यासह बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांतील समन्वयक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रंथदिंडीमध्ये विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, एनएसएस समन्वयक आणि ग्रंथपालही सहभागी झाले.
शालेय विद्यार्थ्यांचे आवेशपूर्ण झांजवादन
यंदाच्या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग लक्षणीय होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींचे संचलनही लक्षवेधक ठरले. मात्र शहराचे लक्ष वेधून घेतले ते शालेय विद्यार्थ्यांच्या ढोल आणि झांज पथकांनी. अत्यंत आवेशपूर्ण अशा पद्धतीने ढोल, ताशा आणि झांज वादन करीत ग्रंथदिंडीमध्ये या मुलांनी जणू प्राण ओतला. अंगातून लागलेल्या घामाच्या धारांमध्ये स्वतः चिंब भिजताना आपल्या जोशपूर्ण वादनाच्या वर्षावात सर्वांना चिंब करून सोडले. कुलगुरू डॉ. शिर्के यांना या मुलांसमवेत वादन करण्याचा आणि त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या कौतुकाची थाप या मुलांच्या पाठीवर दिली.
वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची वाचकांना पर्वणी
ग्रंथदिंडीनंतर सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या अनेक्स इमारत परिसरात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून हे उद्घाटन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ प्रकाशन विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांसह नवी दिल्ली येथीलही १७ प्रकाशक व ग्रंथविक्रेते महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथप्रेमी व वाचनवेड्या व्यक्तींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे. या सर्व स्टॉलची कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनी फिरून पाहणी केली आणि सहभागींना शुभेच्छा व धन्यवाद दिले.
याखेरीज येथे खाद्यपदार्थ व पेय विक्रीचे ११ स्टॉल आहेत. डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. प्रवीणकुमार पाटील, डॉ. दीपा इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली एम.बी.ए. अधिविभाग, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचेही स्टॉल आहेत. त्यामध्ये काही प्रयोगशील पोषक खाद्यपदार्थांसह चॉकलेट्स, ज्यूस, ऊसाचा रस यांचा समावेश आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, एसयूके-आरडीएफ कंपनी यांसह स्टार्टअप उपक्रमाला वाहिलेल्या स्टॉलचाही त्यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, केवळ पदार्थ विक्री करण्याचे उद्दिष्ट बाळगू नका, तर आपले स्वतःचे बिझनेस मॉडेल कसे विकसित कराल, त्याचे सादरीकरण तयार करण्याची सूचना केली.