आ. अमल महाडिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली प्रलंबित विषयांवर चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर आ. अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची भेट घेऊन विविध प्रलंबित विषयांवर विस्तृत चर्चा केली.

 

 

 

महापालिका क्षेत्रातील गॅस पाईपलाईन, अमृत योजनेअंतर्गत प्रलंबित असणारी कामे, के एम टी बस सेवा, शहरातील पथदिवे, पार्किंग, क्रीडांगणे, बगीचे यांच्या समस्या, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अशा विविध विषयांसंदर्भात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्याच्या सूचना आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना महाडिक यांनी केल्या. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी कोल्हापूर शहरांतर्गत वाढीव भागाच्या नगर भूमापना संदर्भात बैठक घेण्यासंदर्भात चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळणारा निधी, ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करणे, जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे, गायरान जमिनीमधील उपलब्ध जागांवर ग्रामपंचायत स्तरावर क्रीडांगण विकास अशा विविध विषयांसंदर्भात बैठक घेण्याचे निर्देश दिले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ शहरी निमशहरी आणि ग्रामीण भागात विभागलेला असल्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर समन्वय राखत विकास कामांवर भर देण्याचा माझा मानस आहे. असे मत अमल महाडिक यांनी व्यक्त केले. प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही यावेळी त्यांनी दिला.