कामाच्या शिदोरीवर मंत्री हसनमुश्रीफ यांचे मंत्रीपद तहहयात : खा. धैर्यशील माने यांचे गौरवोद्गार

सेनापती कापशी : पालकमंत्री हसन  मुश्रीफ यांच्या कामाची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेतोय. कामाच्या शिदोरीवरच त्यांचे मंत्रीपद तहहयात आहे, असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. संपूर्ण आयुष्यभर ते गोरगरीब जनतेचे सेवक बनून राहिले. त्यांनी मंत्रिपदाचा बडेजाव कधीही केला नाही, असेही ते म्हणाले.

 

 

 

खासदार माने पुढे म्हणाले, मंत्री  मुश्रीफ यांची गेल्या ३५-४० वर्षातील वाटचाल पाहता त्यांच्या वाट्याला संघर्ष भरपूर आहे. परंतु; यशही निश्चितच आहे. त्यांच्या कार्य कर्तुत्वाच्या उंचीपुढे जात-पात, धर्म, पक्ष -पार्टी कधीच आडवी आली नाही. तरुणांसाठी ते आयडॉल आहेत. जात-पात, धर्म या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ माणुसकीच्या तत्त्वावर त्यांनी आयुष्य खर्ची घातले.

पवारसाहेबांचा त्या गद्दाराला पाडण्याचा संदेश …..!

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, देशाचे नेते शरद पवारसाहेब हे आमचे दैवत होते, आहेत आणि राहतील. त्यांनी गडहिंग्लजच्या सभेत सांगितले की, ईडीची फाईल अजून मिटलेली नाही. ती टेबलवरून कपाटात नेऊन ठेवलेली आहे. परंतु; मी नम्रपणे सांगू इच्छितो की, मला क्लीन चीट मिळालेली आहे. त्यांना मी त्याबद्दल माहितीही देईन. परंतु; राजकीय स्वार्थापोटी हे शुक्लकाष्ठ माझ्या आणि कुटुंबाच्या मागे लावणाऱ्याला ते मांडीवर घेऊन बसले आहेत. दरम्यान; आम्ही श्री पवारसाहेब यांना ३० -३५ वर्षात काही ना काही गुरुदक्षिणा दिलेली आहे. परंतु; दहा वर्षे भाजपमध्ये राहून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून कसलीही गुरुदक्षिणा न दिलेल्या गद्दाराला पाडा, असा संदेश श्री. पवारसाहेबांनी या सभेत दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे…. !

मंडलिक गटाने हे जाणून घ्यावे……!

शशिकांत खोत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत प्रवीणसिंह घाटगे यांनी शाहू महाराजांच्या स्टेजवर जाणं आणि प्रचार करणे. तसेच; आता समरजीत घाटगे यांच्या प्रचारासाठी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती मालोजीराजे यांनी येऊन सभा घेतली. हे सगळं यांचं आधीच ठरलेलं होतं. कारण; विधानसभेला मंत्री हसन मुश्रीफ यांना तिकीट मिळणार आणि हाच रस्ता आपल्याला धरावा लागणार याची त्यांनी पूर्वतयारी आधीच केलेली होती. मंडलिक गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे जाणून घ्यावे, असेही ते म्हणाले.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांची केलेली सेवा आणि मतदारसंघाचा केलेला सर्वांगीण विकास यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यांना विक्रमी आणि ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी तिन्ही गट एकत्र आले आहेत. त्यामुळे विरोधी बाजूला काहीच शिल्लक राहणार नाही. त्यांची पळताभुई थोडी होईल.

उदयबाबा घोरपडे म्हणाले, महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह स्मारक तयार झाले आहे. या स्मारकावरही विरोधक टीका करीत आहेत. परंतु; प्रतिकूल परिस्थितीतूनही अनंत अडचणीतूनही मुश्रीफ या खवण्यान ते करून दाखवलं.

ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, मुश्रीफ गट, मंडलिक गट, संजयबाबा घाटगे गट असे तिन्ही गट एकत्र आलो आहोत. मंत्री श्री. मुश्रीफ यांचा विजय एक लाखाहून अधिक मताधिक्याने होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.

उदयबाबा घोरपडे, अंबरीशसिंह घाटगे, दत्ताजीराव देसाई, विजय काळे, भागवत शेटके, प्रवीण नाईकवाडे, सौरभ नाईक यांची मनोगते झाली.
व्यासपीठावर दत्ताजीराव घाटगे, प्रदीप चव्हाण, परशराम तावरे, भाजपचे भरत पाटील, एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिल्पाताई खोत, रामचंद्र सांगले, तानाजी पाटील, अंकुश पाटील, एकनाथ कामते, संतोष बरकाळे, अरविंद नाईक, जयसिंग भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत सरपंच सौ. उज्वला कांबळे यांनी केले. प्रास्ताविक शशिकांत खोत यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कुंभार यांनी केले. आभार बाबुराव गुरव यांनी मानले.