टक्केवारीसाठी मारणारा हवा की सर्वसामान्यांना तारणारा हवा? – रविकिरण इंगवले

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ऐतिहासिक असून टक्केवारीसाठी मारणारा लोकप्रतिनिधी हवा की सर्वसामान्य तारणारा हवा याचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रविकिरण इंगवले यांनी केले. लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, सरचिटणीस आरती सिंग, आर.के.पोवार, सुनील मोदी, संदीप देसाई, सरलाताई पाटील, भारती पवार, संध्या घोटणे, प्रवीण इंदुलकर, विशाल देवकुळे, दिनेश परमार, दिलीप शेटे, भारती पोवार, महेश उत्तुरे, दत्ता टिपुगडे, कॉ. चंद्रकांत यादव, पूजा नाईकनवरे हे प्रमुख उपस्थित होते.

 

 

एका बाजूला राजेश लाटकर यांच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आणि दुसरीकडे केवळ स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास करणारी व्यक्ती. राजेश लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार बनवून कोल्हापूरच्या जनतेने इतिहास घडवावा असे इंगवले म्हणाले. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी असेल, जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून कामात कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले. आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून निस्वार्थी जनसेवा करणे व ‘नो खंडणी नो कमिशन‘ हेच माझे मिशन असेल असे लाटकर म्हणाले.

प्रेशर कुकर या माझ्या चिन्हापुढील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन लाटकर यांनी यावेळी केले. महाविकास आघाडी सरकार महिलांना प्रतिमाह तीन हजार रुपये देणार आणि ते सुद्धा सन्मानाने देणार अशी घोषणा राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी केली. सत्तेत बसलेले असंवैधानिक सरकार जनतेचेच पैसे महिलांना देत आहे मात्र त्यासाठी त्यांना लाचारी पत्करायला लावत आहे. आता तर ते महिलांना धमकावीत आहेत हे निषेधार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत. पण त्यांच्या पुतळ्यातही सत्तेत बसलेल्या गद्दारांनी भ्रष्टाचार केला व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. जनतेने महायुती सरकारला पराभूत करून त्यांना धडा शिकवावा.

यावेळी बोलताना सरलाताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसने श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना अशा कित्येक योजना आणल्या पण त्याचा कधीही बॅनर, जाहिराती देऊन गाजावाजा केला नाही. महिला कोणत्या पक्षाच्या आहे हे न पाहता सर्वाना त्याचा लाभ दिला. यावेळी बोलताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्याप्रमाणे लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून प्रत्येक घटक सक्षम, स्वावलंबी होण्यास मदत होईल. राजेश लाटकर यांना विजयी करून सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र चे स्वप्न साकार करूया. या सभेत सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. या सभेसाठी राजारामपुरी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अलका लांबा यांच्या हस्ते महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार प्रतिमाह, महिला व मुलींसाठी बस प्रवास मोफत, प्रत्येकी पाचशे रुपयात सहा सिलेंडर, कृषी समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे तीन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपये पर्यंत मदत अशा योजना जाहीरनाम्यात समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.