रिक्षा चालकांना सतावणारा खराब रस्त्यांचा प्रश्न सहा महिन्यात निकाली काढणार – राजेश लाटकर

कोल्हापूर: रिक्षा चालकांना सतावणारा खराब रस्त्यांचे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढणार असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. लाटकर यांच्या समर्थनार्थ कांग्रेस कमिटी येथे आयोजित रिक्षाचालक मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास काँग्रेसचे निरीक्षक सुखविंदर ब्रार, तमिळनाडूचे आमदार मौलाना हसन, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई हे प्रमुख उपस्थित होते.

 

 

राजेश लाटकर पुढे म्हणाले, माझे सारे जीवनचरित्र तुमच्यासमोर आहे, तसेच सुरवातीच्या काळात मीही रिक्षा चालवत असल्याने तुमच्या व्यथा आणि वेदना मला माहीत आहेत. तुमचा कणा ज्यामुळे दुखतो आणि रिक्षाचा मेटेंनन्स ज्यामुळे वाढतो अशा रस्त्याचा प्रश्न सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन मी तुम्हाला देतो. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासाठी मी सदैव उपलब्ध असेन. खंडपीठ, पोलिस आयुक्तालय याचबरोबर रिक्षाचालकांशी संबंधित सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यास हा राजू लाटकर कटीबद्ध असेल असे लाटकर म्हणाले. विद्यमान सरकारने रिक्षाचालकांच्या कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक केली नाही. अगदी स्वतंत्र महामंडळ न स्थापन करता ट्रकच्या गटामध्ये स्थान दिले. अशी प्रत्येत प्रश्नात या सरकारने फसवणूक केली आहे. नऊ हजार रिक्षाचालकांच्या समस्या राजू लाटकर सोडवतील असे प्रतिपादन कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदूलकर यांनी केले. आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी येत्या २० तारखेला प्रेशर कुकर चिन्हापुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूया असे आवाहन त्यांनी केले.

आपचे संदीप देसाई म्हणाले, कोल्हापूरचा रिक्षाचालक प्रामाणिक आहे, तो रक्कम असो व दागिने त्याला हात न लावता प्रामाणिकपणे संबंधिताला परत करतो. देशभर राबवावा असा हा कोल्हापुरी रिक्षा पॅटर्न आहे. याच कोल्हापुरातील आमदार हा प्रामाणिक आणि जनसामान्याशी नाळ जोडलेला असावा यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांना बहुमताने निवडून देऊया. सगळ्या कामात टक्केवारी शोधणाऱ्या महायुती सरकारला येणाऱ्या २० तारखेला धोबीपछाड देऊया असेही ते म्हणाले. आम्ही रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी केली आहे. त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस असणारे राजेश लाटकर यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊया आणि आपल्या विविध समस्यांची सोडवणूक करून घेऊया असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित रिक्षाचालकांनी लाटकर यांना पाठिंबा व्यक्त केला व त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. जाफर मुजावर, श्रीकांत पाटील, उदय इनामदार, संजय कोळे, संभाजी रणदिवे, सुनील थोरात, सुरेश धनवडे, निलेश रणभिसे, जयदीप कोटलगे, महादेव आग्रे, गणेश तुपवाडकर यांच्यासह मान्यवर व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस सचिव संजय वाईकर यांनी आभार मानले.