मुरगूडची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की, विरोधकांना धडकीच भरली पाहिजे : संजय मंडलिक

मुरगूड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूडमध्ये शुक्रवारी दि. १५ होणारी महायुतीची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की विरोधकांना धडकीच भरली पाहिजे, असा इशारा माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुख्य बाजारपेठेतून मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक यांच्या उपस्थितीत भव्य रॅली निघाली. ग्रामदैवत श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन रॅलीची सांगता व जाहीर सभा झाली. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या योगदानातूनच ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीचे घडीव शिल्पकलेचे मंदिर साकारले आहे. मंत्री मुश्रीफ यांना मत म्हणजे साक्षात ग्रामदैवत अंबाबाईला मत. पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्यामुळे ग्रामदैवत श्री. अंबाबाई देवीचे घडीव शिल्पकलेतील मनोहारी मंदिर साकारले आहेच. मुरगूड शहराच्या विकास कामानांही त्यांनी भरपूर निधी दिला आहे. आपण सर्वजण एकसंघ बनवून एकमुखाने त्यांची पाठराखण करूया.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या इतक्या सुंदर मंदिरासाठी मला भरपूर निधी देता आला, हे माझे भाग्य आहे. मुरगूडकरांनॊ आपली सर्व शक्ती एकत्र करून मला इतके प्रचंड मताधिक्य द्या की, विरोधी उमेदवाराचे धाबे दणाणले पाहिजेत. प्रा. संजय मंडलिक आणि आपण मंदिर आणि मुरगूड शहराच्या विकासासाठी प्रचंड निधी मिळवू शकलो. मतदारसंघासाठी सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला. आज सर्व कामांच्या पुण्याईवर तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे.

माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, शुक्रवारी दि. १५ मुरगूडात होणाऱ्या आमच्या सभेने पालकमंत्री मुश्रीफ यांचा विक्रमी आणि ऐतिहासिक मताधिक्यांचा विजय स्पष्ट होईल. मुरगूड शहरातील सर्व कामे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गी लावली. विरोधी उमेदवारांनी एकही काम केले नाही. त्यामुळे सर्व ताकदीनिशी कामाला लागावे. प्रत्येक घरा-घरात जाऊन प्रचार करून मुश्रीफ यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणावे. मला लोकसभेला पडलेल्या मताधिक्यापेक्षाही जादा मते मंत्री मुश्रीफ यांना पडली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

एक लाखाची ओटीभरणी……
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, लोकसभेला मला मुरगुडमधून १,८०० मताधिक्य आहे. ते पार करून त्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळवा. आपण ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या चरणी एक लाखाची ओटीभरणी अर्पण करू.

एक मत अंबाबाईसाठी…!
गेली अनेक वर्षे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराचे काम रखडले होते. मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी या मंदिराच्या पूर्तत्वासाठी प्रचंड निधी दिला. त्यामुळेच मंदिर पूर्ण झाले. म्हणूनच या अंबाबाई देवीसाठी एक मत हसन मुश्रीफ यांना प्रत्येकाने द्या, असे भावनिक आवाहन केले.