समरजितसिंह घाटगे यांचे मराठा समाजाबद्दलचे प्रेम बेगडी- गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांचा घणाघात

भडगाव: ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आंदोलने, मोर्चे सुरू होते. त्यावेळी समरजीतसिंह घाटगे यांना कोणतीही उपरती झाली नाही. आता मात्र स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांना मराठा योद्धे मनोज जरांगेदिसत आहेत. त्यांची भेट घेऊन पोस्टरबाजी करत आहेत. जाती-पातीचा आधार घेऊन मते मागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे मराठा समाजाबद्दलचे प्रेम बेगडी असल्याचा घणाघात गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी केला.

 

 

प्रचारार्थ भडगावसह चौंडाळ, कुरणी, मळगे बुद्रुक येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बिद्रीचे संचालक सुनीलकुमार सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

अंबरीशसिंह घाटगे पुढे म्हणाले, गेली २५ वर्ष मंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि संजयबाबा घाटगे एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र; कधीही जातीयवाद केला नाही आणि व्यक्तिगत पातळीवर येऊन टीकाटिप्पणीही केली नाही. राजकारणामध्ये विशिष्ट दर्जा असतो, तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र; स्वतःच्या सार्थापोटी विरोधक तुरुंगात गेला पाहिजे, त्याच्या कुटुंबीयांना त्रास झाला पाहिजे, असे अघोरी वर्तन करणारे समरजीतसिंह घाटगे ही निवडणूक लढवत आहेत. अशा प्रवृत्तीला रोखणे ही काळाची गरज असल्याचे, ते म्हणाले.

गेल्या चार- साडेचार वर्षांच्या कालावधीत मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत मतदार संघामध्ये सात हजार कोटी रुपयांची विकास कामे केली. हाच विकास कामाचा लेखा-जोखा घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा सातव्यांदा निवडणूक लढवण्यासाठी उभा आहे. तुमच्या मोजमापात मी शंभर टक्के उतरेल, याची मला खात्री आहे. तुम्ही मला एक लाख मताहून अधिक मताधिक्याने विजयी कराल, अशी खात्री देखील आहे. यावेळी मनोज फराकटे, सुनीलराज सूर्यवंशी, विजय काळे, अनिल सिद्धेश्वर, सौ. रुपाली सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

भडगाव येथे सरपंच बी. एम. पाटील, संदीप पाटील, ज्ञानदेव मांगोरे, पी. आर. पाटील, रंगराव चौगुले, अमोल पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कुरणी येथे सरपंच सिद्धगोंडा पाटील, विलास पाटील, शिवाजी माने, सदाशिव पाटील, आनंदा पाटील, नंदकुमार गुरव, श्रीकांत पाटील, पी. डी. रणदिवे. मळगे बुद्रुक येथे आनंदराव अस्वले, श्रीकांत पाटील, प्रताप पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते..