कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रिडाईतर्फे आयोजित ‘दालन २०२४’ या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बांधकाम व वास्तूविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असणार आहेत. अशी माहिती किडाईचे चेअरमन के. पी. खोत व दालनचे चेअरमन चेतन वसा यांनी दिली.
महासैनिक दरबार लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमास खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष
ललित गांधी उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
शनिवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या टेक्निकल सेमिनारमध्ये यशोधन कन्स्ट्रो लॅबचे सीईओ सुधीर हंजे व डीप फेरो टेकचे संस्थापक नंदकुमार जाधव मार्गदर्शन करतील. रविवारी ११ फेब्रुवारी रोजी ‘स्त्रीशक्ती आणि आयुर्वेदाची महती’ या विषयावर आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीची विशेष उपस्थिती आहे. आ. जयश्री जाधव, मधुरिमाराजे तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई उपस्थित राहणार आहेत. सोमवारी 12 फेब्रुवारी दुपारी ४ वाजता प्रदर्शनाची सांगता अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे,महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत होणार आहे.
‘दालन’मध्ये सुमारे २०० स्टॉल्स असून, सर्व स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. क्रिडाईचे जवळपास शंभर सभासद असून, त्यांचे शंभरहून अधिक प्रकल्प प्रदर्शित होणार आहेत. बांधकाम साहित्य कंपन्या तसेच वित्तीय संस्थांचे स्टॉल्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रिडाई सचिव संदीप मिरजकर, खजानिस अजय डोईजड, 'दालन'चे चेअरमन चेतन वसा, व्हाईस चेअरमन प्रमोद साळुंखे, समन्वयक अतुल पोवार, 'दालन'चे सचिव गणेश सावंत, खजिनदार श्रीधर कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.