भोपाळ : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्यात तर मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळालं.तर तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा धुव्वा उडवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं.
मिझोराममध्ये नवख्या ZPM पक्षाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. या निवडणूक निकालांत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हिंदी पट्ट्यातील महत्त्वाची तीन राज्यं गमावल्यानंतर नेमकी चूक कुठे झाली, याबाबत पक्षात चिंतन सुरू आहे. अशातच मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी मात्र इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केले आहेत. चिप असणारी कोणतीही मशिन हॅक होऊ शकते, असा दावा दिग्विजय सिंहांनी केला आहे.
मध्य प्रदेशात भाजपला चितपट करत आपण पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपने तब्बल १६३ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ ६६ जागांवर यश मिळालं. मात्र एकीकडे काँग्रेसचा असा पराभव झालेला असताना दिग्विजय सिंह यांनी पक्षाला बॅलेट पेपरच्या माध्यमातून मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.
“चिप असणारं कोणतंही मशिन हॅक होऊ शकतं. मी २००३ पासून ईव्हीएमला विरोध करत आहे. आपण आपल्या भारतीय लोकशाहीचं नियंत्रण प्रोफेशनल हॅकर्सच्या हातात देणार आहोत का? हा मुलभूत प्रश्न सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेतला पाहिजे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांनी कृपया भारतीय लोकशाहीचं रक्षण करावं,” असं दिग्विजय सिंह यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या आकड्यांमध्ये एवढा फरक कसा?’
दिग्विजय सिंह यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “पोस्टल बॅलेटवरून मिळालेल्या मतांनुसार काँग्रेसला १९९ मतदारसंघांमध्ये आघाडी आहे. मात्र यातील बहुतांश जागांवर ईव्हीएम मशिनवरून मिळालेल्या मतांमध्ये काँग्रेस मागे आहे. या दोन्ही माध्यमातून मिळालेल्या मतांवेळी वोटिंग पॅटर्नमध्ये इतका बदल कसा झाला आहे?” असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.