राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार ;  भाजपच्या नेत्याने केले भाकीत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ मध्ये ८० तासांसाठी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार बनल्याचे राज्याने पाहिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत मविआ सरकार बनवले.अडीच वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि ठाकरे सरकार कोसळले

अलीकडेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अजित पवारांच्या भूमिकेमुळे फूट पडली. आता राज्याच्या राजकारणात येत्या १५-२० दिवसांत आणखी एक मोठी घटना घडणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रवी राणा यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

आमदार रवी राणा म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून अजित पवार जसे सरकारमध्ये सहभागी झाले त्याचपद्धतीने शरद पवार हे मोदींना पाठिंबा देतील असं साकडे मी लालबागच्या राजाला घातले होते. राज्य आणि केंद्रातील विकासकामांना पवार साथ देतील. गेल्या १० दिवस मी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला आराधना केली. येणाऱ्या १५-२० दिवसांत चमत्कार होईल आणि शरद पवार हे मोदींना पाठिंबा देतील असा विश्वास मला वाटतो. राज्यात आणि केंद्रातील सरकार शरद पवारांच्या मदतीने मजबूत होईल आणि राज्य, केंद्राचा विकास जोमाने होईल असंही राणा यांनी म्हटलं.

तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अजित पवार विरोधी पक्षनेते होते, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राजकारणात कुठलीही गोष्ट शक्य आहे. जर १५ दिवसांत शरद पवार मोदी सरकारसोबत आले तर अजित पवार हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात असंही आमदार रवी राणा यांनी सांगितले. 

दरम्यान राणांनी चुकीचे दावे करणे योग्य नाही. रवी राणा हे भाजपाचे प्रवक्ते नाहीत. परंतु राणा यांना भाजपाने काही बोलायला सांगितले असेल तर त्याची कल्पना नाही. परंतु असे बेफाट वक्तव्ये करून दरवेळी चर्चेत राहणे योग्य नाही. ते जर इथे आले तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे आखाडे बांधणे रवी राणा यांना शोभत नाही. युतीमध्ये असेल आणि अधिकृतरित्या तुम्हाला बोलायची परवानगी असेल तर तुम्ही निश्चित बोला. परंतु असे आखाडे बांधून उगाच आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात राणा यांचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी फेटाळला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

रवी राणा यांच्या विधानाची मला खरेच काही माहिती नाही. मी माझ्या कामांत आहे. कांद्याचा प्रश्न आहे. मी इतर कामात व्यस्त असल्याने फारसा वेळ इतर गोष्टीवर लक्ष ठेवायला जमत नाही असं सांगत राणा यांच्या विधानावर भाष्य करणे टाळले.

रवी राणांचे जुने भाकीत खरे ठरले

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात रवी राणा यांनी म्हटलं होतं की, जेव्हा मोदी-शाह हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार हे सरकारसोबत येतील. कोणत्याही क्षणी हा हिरवा कंदील मिळू शकतो. तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल होतील. इतकेच नाही तर शरद पवारांच्या परवानगीनेच अजित पवार सहभागी होतील असं राणांनी भाकीत केले होते. ते भाकीत अजित पवारांच्या बाबतीत खरे ठरले. अजित पवार राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांसह सरकारमध्ये सहभागी झाले.