कोल्हापुरात तब्बल वीस तासानंतर संपली विसर्जन मिरवणूक….

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक परवा सकाळी नऊपासून सुरू झाली होती. तब्बल वीस तासांनंतर पहाटे पाच वाजता संपली. विसर्जन मार्गावर दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर राहिला. काळ कितीही बदलला तरी आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे, असाच संदेश या मिरवणुकीच्या निमित्ताने एकवटलेल्या तीन्ही पिढ्यांनी दिला. दरम्यान, किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळी नऊच्या सुमारास खासबाग येथे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीचे पूजन झाले आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, विजय देवणे, आर. के. पोवार, लालासाहेब गायकवाड, दिलीप देसाई, किसन कल्याणकर, तालमीचे अध्यक्ष शिवाजी पोवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तालमीने मिरवणुकीत आणलेला ‘राजर्षी शाहूंची हीच दूरदृष्टी काय?’ हा रथ लक्षवेधी ठरला. त्यानंतर मिरजकर तिकटीमार्गे ही मिरवणूक पुढे गेली आणि त्याचवेळी सर्व मंडळांच्या मिरवणुका मुख्य मार्गाकडे येवू लागल्या.

महाद्वार रोडवर दिवसभर पारंपरिक ढोल-ताशा, झांजपथकांसह लेझीम पथकांचा गजर राहिला. सायंकाळनंतर मात्र या मार्गावर साऊंड सिस्टीम आणि लेसर शोचा झगमगाट सुरू झाला आणि त्याचवेळी येथे दुतर्फा मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले. रात्री बारा वाजता पोलिसांनी सर्व साऊंड सिस्टीम आणि वाद्येही बंद करायला भाग पाडले आणि हा दणदणाट थांबला. त्यानंतर पोलिसांनी मंडळांना पुढे सरकण्याची विनंती करत मिरवणुकीची पहाटे पावणेपाचच्या सुमारास सांगता केली.

राजारामपुरी चौदाव्या गल्लीतील अष्टविनायक तरुण मंडळ आणि श्रमिक युवा मित्र मंडळांच्या गणेशमूर्तींची पापाची तिकटी येथे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर इराणी खणीवर असलेल्या विसर्जनाच्या ठिकाणी सकाळी सव्वाआठ वाजता या मूर्तींची महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते आरती झाली. दरम्यान, पंचगंगा घाट, इराणी खणीसह शहरातील पंचवीस ठिकाणी लहान मंडळांच्या मूर्तींचे व घरगुती बाप्पांचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन झाले.