डायबिटीज रुग्ण आहात ; मग तुमच्यासाठी आहारातील काही टिप्स

सकाळचा नाश्ता हा आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचा असतो. जगभरात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत असून डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराबाबत जास्त सजग राहण्याची गरज असते. तेव्हा डायबिटीज रुग्णांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहावी यासाठी सकाळच्या नाश्त्याची वेळ निश्चित करणे हे देखील गरजेचे आहे. तेव्हा अश्या रुग्णांसाठी सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊयात.

नाश्ता हा दिवसभरातील आहारमधील एक महत्वाचा भाग आहे. परंतु डायबिटीजच्या रुग्णांनी जर तो वेळेवर घेतला नाही तर तुमच्या ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकतात.डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याची घाई करू नये. जर तुम्ही झोपेतून उठल्यावर काहीवेळाने लगेच नाश्ता केला तर डायबिटीजवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.

सकाळी उठल्यावर लगेच नाश्ता करणे ही नाश्ता करण्याची खूप चुकीची वेळ आहे. कारण यामुळे रक्तातील साखर वाढते. याचे कारण म्हणजे शरीरातून कोर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोन्स बाहेर पडतात.तेव्हा अशा वेळी जर तुम्ही नाश्ता केलात तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. त्यामुळे डायबिटीजवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. तेव्हा सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन तासांनी डायबिटीजच्या रुग्णांनी नाश्ता करावा, ही तुमच्यासाठी उत्तम वेळ असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढत नाही.

सकाळच्या नाश्त्यात डायबिटीजच्या रुग्णांनी साखर न घातलेले दही, उकडलेल्या अंड्याचा सफेद भाग, ऑम्लेट, ओट्स, फ्रूट स्मूदी, ग्रील्ड चिकन, सफरचंद, नाशपाती, पपई सारखी ताजी फळे खावीत. सदर लेख हा उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे. तेव्हा दिलेल्या माहितीचा अवलंब करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.