‘गोकुळ’ मार्फत अॅटो मिल्क सॅम्पलर युनिट प्रणालीचे उद्घाटन

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वतीने टेक पी.एम.जी.बिजनेस सोल्युशन प्रा.लि,पुणे या कंपनी मार्फत श्री दत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. केर्ले ता. करवीर येथील बल्क कुलर युनिटमध्ये महाराष्ट्रातील पहिले अॅटो मिल्क सॅम्पलर युनिट प्रायोगीक तत्वावरती बसवले असून या प्रणालीचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते. तसेच संघाचे संचालक व दूध संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थित झाले.

या प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, सध्या दुग्धव्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय बनला असून या व्यवसायामध्ये दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापैकी दूध संकलन हा एक महत्त्वाचा भाग असून बल्क कुलर दूध संकलन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश ठिकाणी दूध संकलन संपूर्णपणे मॅन्युअली प्रक्रियेवर अवलंबून आहे ही सर्वात मोठी समस्या आहे. बल्क कुलर दूध संकलन केंद्रावरील यंत्रणा अचूक असणे खूप गरजेचे आहे. या करिता ही कार्यप्रणाली प्रायोगिक तत्वावरती येथे बसवण्यात आली असून यामुळे बल्क कुलर टँकमधील दुधाचे फॅट आणि एस.एन.एफ तापमान, दुधातील पाण्याचे प्रमाण हे समजेल आणि ऑनलाईन स्वयंचलित मशीनद्वारे संघाच्या यंत्रणेकडे पाठवले जाणार आहेत. तसेच संकलन ठिकाणीच बल्क कुलर युनिट मधील दुधाची जागेवरती गुणप्रतीची पडताळणी होणार असून संस्थेस त्या दुधाची गुणप्रत समजण्यास मदत होणार आहे. भविष्यात या कार्यप्रणालीचा सविस्तर अभ्यास करून गोकुळ संलग्न गावपातळी वरील सर्व बल्क कुलर युनिटवरती ही कार्यप्रणाली बसवण्यात येणार असल्याचे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले .

यावेळी बोलताना संघाचे जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले कि, प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात आलेली ही प्रणाली निश्चितच गोकुळ व दुध संस्था यांना गुणवत्तेच्या बाबतीत फायदेशीर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

तसेच संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी या प्रणालीची फायदे सांगताना म्हणाले अॅटो मिल्क सॅम्पल युनिटमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नसल्याने ही प्रक्रिया वेगवान होईल, रिपोर्ट अचूक मिळतील, क्लाऊड प्रणालीमुळे सर्व डेटा सुरक्षित राहील, बीएमसीचे सर्व रिपोर्ट्स एकाचजागी आणि एकाच वेळी वेगवेगळ्या गोकुळच्या संबंधित विभागांना मिळाल्यामुळे कामामध्ये सुसूत्रता येईल.

या कार्याक्रमाचे स्वागत प्रास्ताविक श्री दत्त दुध संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी केले यावेळी गावातील सर्व दुध संस्थांचे चेअरमन यांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर आभार प्रल्हाद मेथे यांनी मांडले.

या उद्घाटन प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, अजित नरके, बाळासो खाडे, संभाजी पाटील , प्रकाश पाटील, किसन चौगले, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व संघाचे अधिकारी व दत्त दूध संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील, मार्केट कमिटेचे माजी संचालक दशरथ माने, संपतराव भोसले, दिंगबर वाळूज, रामभाऊ मेथे, संग्राम पाटील, गजानन पिस्टे, दामोदर लोहार, सचिन माने, केर्ले,पडवळवाडी,रजपूतवाडी येथील सर्व दूध संस्थेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.