डॉ. हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर

मुंबई- ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. या माध्यमातून ५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

शोध पत्रकार, समाजसुधारक, विद्यार्थी यांना ५ लाखांपर्यंत मदत मिळणार असं भुजबळ म्हणाले आहेत. यासाठी एका समितीची स्थापना होईल. त्याच्या माध्यमातून उमेदवारवाराचा शोध घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. समता परिषदेमार्फत दर वर्षी ९ ऑगस्टला शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. भुजबळ यांना हरी नरके यांच्याबाबत बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ॲागस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात असताना हरी नरके यांच्याबद्दल कळालं असं त्यांनी सांगितलं. सगळीकडून वार होत असताना ते आधारस्तंभ होते. फुले, शाहू,आंबेडकर म्हटलं की ते लढायला तयार असत, ते ही पुराव्यासह.ते खणखणीत नाणं होते. ओबीसी जणगणनेचा विषय असेल, आरक्षणाचा विषय असेल, हरी नरके सगळ्यात पुढे असायचे असं भुजबळ म्हणाले.