जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत कंटेनर ट्रेन…

रत्नागिरी : मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्‍टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे.कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. जेएनपीटी आणि उत्पादन युनिट्समधील रस्ता खराब आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो.

रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.